कल्याण-डोंबिवलीमध्ये वाढत्या गुन्हेगारींवर (KDMC Crime) आता वेळीच लक्ष घालण्याची गरज आली आहे. तसेच ठाकुर्ली येथील ९० फूट रस्त्याच्या आसपासच्या भागात काही भुरट्या चोरांच्या कुरापती दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सोमवारी सकाळी ६ वाजता चोळेगाव तलावापासून ९० फूट रस्त्यावर पायी जाणाऱ्या एका महिलेला दुचाकीवरून आलेल्या दोन पुरुषांनी पत्ता विचारायच्या बहाण्याने महिलेशी बोलत ती पत्ता सांगत असतानाच चोरट्यांनी अचानक तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला.
त्रिमूर्ती नगर झोपडपट्टीतील रहिवासी महिला ही घरकाम करते. सोमवारी सकाळी ६ वाजता ती तिच्या कामाच्या ठिकाणी पायी जात होती. ती चोळेगाव तलावापासून ९० फूट रस्त्यावरील श्री कृष्णा प्लाझा इमारतीजवळ चालत असताना अचानक दुचाकीवरून दोन चोर तिच्या समोर आले. त्यांनी सदर महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. या परिसरातून अज्ञात वाहनचालक जात होते, त्यामुळे ती २० ते २५ वयोगटातील एका दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी विचारलेल्या पत्त्याबद्दल विचार करत होती. ती पत्ता सांगत असतानाच दुचाकीच्या मागे बसलेल्या एका व्यक्तीने महिलेच्या मानेवर थाप मारली आणि गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतली आणि दुचाकीवरून पळून गेला. सदर महिलेने चोर चोर असा आरडाओरड केला मात्र तोपर्यंत चोर पळून गेले होते. सकाळी चोळेगाव तलाव परिसर शांत असतो. त्यामुळे तिला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक पी. एन. देसाई या प्रकरणाचा तपास करत आहेत.