Maharashtra Budget 2025: मुंबई, पुणे, नागपूरसह महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती

माय मराठी
3 Min Read

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 चा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. या शहरांमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. अजित पवार यांनी सांगितले की, मुंबई, पुणे आणि नागपूर महानगरांमध्ये एकूण 143.57 किमी लांबीचे मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत. या सेवेमुळे दररोज सुमारे 10 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. पुढील वर्षभरात मुंबईत 41.2 किमी आणि पुण्यात 23.2 किमी असे एकूण 64.4 किमी लांबीचे नवीन मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. पुढील 5 वर्षांत महाराष्ट्रात एकूण 237.5 किमी लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित होतील.

नागपूर मेट्रोच्या 40 किमी लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यासाठी ₹6,708 कोटी खर्चून 43.80 किमी लांबीचे काम सुरू आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो आणि पुण्यातील स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच, पुण्यातील खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग या दोन मेट्रो मार्गांसाठी ₹9,897 कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे.

उलवे येथे विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.6 दशलक्ष टन माल वाहतुकीची असेल. या प्रकल्पाचे 85% काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणे यशस्वीरीत्या पार पडली आहेत. एप्रिल 2025 पासून येथे देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याची योजना आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील खोपोली-खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि इंधन बचत होईल. तसेच, ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणारा उन्नत मार्ग तयार करण्याचे नियोजन आहे. यामुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि इतर शहरांना थेट विमानतळाशी जोडले जाईल.

अर्थसंकल्पातील मुख्य घोषणा:

  • स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू: वांद्रे ते वर्सोवा दरम्यान 14 किमी लांबीचा, ₹18,120 कोटी खर्चाचा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण होणार.
  • उत्तन-विरार सागरी सेतू: 55 किमी लांबीचा, ₹87,427 कोटी खर्चाचा प्रकल्प हाती घेतला जाणार.
  • पुणे-शिरूर उन्नत मार्ग: 54 किमी लांबीच्या, ₹7,515 कोटी खर्चाच्या मार्गाचे बांधकाम सुरू होणार.
  • गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा, एलिफंटा: प्रवाशांसाठी सुरक्षित आणि अत्याधुनिक बोट सेवा विकसित करण्यासाठी आर्थिक मदत.
  • मुंबई महानगर प्रदेश ‘ग्रोथ हब’: आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय.
  • आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रे: वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार-बोईसर येथे मोठी व्यावसायिक केंद्रे उभारली जाणार.
Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more