राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 मार्च 2025 रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) सादर केला. या बजेटमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या, त्यातच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेबाबतही मोठी घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेसाठी आतापर्यंत ₹33,232 कोटी खर्च करण्यात आला आहे. 2025-26 साठी या योजनेसाठी ₹36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा काही महिला गटांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी बीज भांडवल म्हणून उपयोग केला आहे. अशा महिलांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विशेष योजना आणण्याचा विचार करत आहे.
या योजनेसाठी 2025-26 मध्ये ₹36,000 कोटींचीच तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना ₹2100 देण्याचे आश्वासन दिल्याचा समज पसरला होता. मात्र, अर्थसंकल्पात यासंदर्भात कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे लाडकी बहिण योजनेतून महिलांना ₹2100 मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात ₹2100 देण्याचे आश्वासन दिले नव्हते. राजकीय जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाते. त्यामुळे भविष्यात हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
‘लेक लाडकी’ योजनेच्या अंतर्गत 1 लाख 13 हजार लाभार्थींना थेट आर्थिक मदत देण्यात आली आहे. 2025-26 मध्ये या योजनेसाठी ₹50.55 कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क 100% परतफेड करण्यात येईल. तसेच, ज्या विद्यार्थिनींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा कमी आहे आणि ज्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेत आहेत, त्यांना हा लाभ मिळणार आहे.