Kalyan : कल्याण गुन्हे शाखेची मोठी कारवाई – २० वर्षांपासून चोरी करणारा चोरटा अटकेत!

माय मराठी
2 Min Read

Kalyan : कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल २० वर्षांपासून ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, भिवंडी आणि नवी मुंबई परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून ५४ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून, चोरीचा ऐवज खरेदी करणाऱ्या मिरा-भाईंदर येथील एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव लक्ष्मण सुरेश शिवचरण (४७) असून, तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे. सध्या तो भिवंडीतील कशेळी गावात राहत होता. पोलिसांच्या चौकशीत त्याने २००४ पासून कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी आणि बदलापूर येथे अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. लक्ष्मण शिवचरणकडून पोलिसांनी ५३ लाख ४१ हजार रुपये किमतीचे ६६ तोळे सोने आणि ७९ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा चोरीचा ऐवज तो सुकेश मुदण्णा कोटीयन (५५) या सोनाराला विकत होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका घरफोडीच्या तपासादरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरी करत असलेला इसम लक्षात आला. पुढील चौकशीत तो सराईत गुन्हेगार लक्ष्मण शिवचरण असल्याचे उघड झाले. तो भिवंडीतील कशेळी गावात राहत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

या कारवाईत कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, उपनिरीक्षक विनोद पाटील आणि त्यांच्या टीमने महत्वपूर्ण भूमिका बजावली. लक्ष्मण शिवचरणच्या अटकेमुळे मागील २० वर्षांतील ५० हून अधिक घरफोड्यांचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. ही मोठी कारवाई उपायुक्त अमरसिंह जाधव आणि साहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more