आपल्या शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि स्नायूंच्या वाढीसाठी प्रथिने (Protein), जीवनसत्त्वे (Vitamins), आणि खनिजे (Minerals) आवश्यक असतात. बहुतांश लोक चिकन, मटण, अंडी आणि मासे यांना प्रथिनांचे उत्तम स्रोत मानतात, मात्र, प्रत्यक्षात डाळीही (Masoor Dal) प्रथिनांनी परिपूर्ण असतात आणि त्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी डाळी हा सर्वोत्तम आणि नैसर्गिक प्रथिनांचा पर्याय आहे. मसूर डाळ ही प्रथिनांनी समृद्ध असून ती शरीरासाठी अत्यंत पोषक आहे. ती फक्त प्रथिनांचा उत्तम स्रोत नाही, तर हृदय, पचनसंस्था आणि रक्तशुद्धीकरणासाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे आहारात मसूर डाळ जरूर समाविष्ट करावी!
मसूर डाळीचे पोषणमूल्य आणि फायदे
- प्रथिनांचे पॉवर हाऊस : मसूर डाळीमध्ये मुबलक प्रथिने असतात, त्यामुळे ती स्नायूंच्या वाढीस मदत करते. शरीराच्या विकासासाठी आणि पेशींना पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.
- हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर : मसूर डाळीमध्ये पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, जे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करते. तसेच, हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.
- पचन तंत्र मजबूत करते : ही डाळ आंतरायुक्त फायबर (Dietary Fiber) ने समृद्ध असल्याने पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता (Constipation) टाळते. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि अन्न सहज पचते.
- प्रतिरोधक शक्ती वाढवते : मसूर डाळीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants), लोह (Iron) आणि फोलेट (Folate) शरीराची इम्युनिटी मजबूत करण्यास मदत करतात. हे घटक शरीराला संसर्गांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असतात.
- वजन नियंत्रण ठेवण्यास मदत : मसूर डाळ ही कॅलरीजमध्ये कमी आणि प्रथिनांनी समृद्ध असल्याने ती वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच, ती जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही.
- हाडांसाठी फायदेशीर : या डाळीमध्ये कॅल्शियम (Calcium) आणि मॅग्नेशियम (Magnesium) भरपूर प्रमाणात असते, जे हाडे आणि सांधे मजबूत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे वृद्धावस्थेत हाडांचे आजार होण्याचा धोका कमी होतो.
- त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त : मसूर डाळीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे त्वचेच्या आरोग्यास मदत करतात आणि केसांची वाढ सुधारतात.
मसूर डाळ आहारात का समाविष्ट करावी?
मसूर डाळ ही प्रथिनयुक्त, फायबर समृद्ध आणि अत्यंत पौष्टिक आहार घटक आहे. हृदयासाठी उपयुक्त असून कोलेस्टेरॉल कमी करते व रक्तशुद्धीकरणास मदत करते. लोह आणि फॉलिक अॅसिडमुळे हिमोग्लोबिन वाढते, त्यामुळे महिलांसाठी फायदेशीर आहे. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने डायबेटिस नियंत्रणात राहतो. वजन कमी करण्यास मदत करणारी आणि पचनसंस्था सुधारणारी ही डाळ हाडांसाठीही लाभदायक आहे. त्वचा व केसांसाठीही फायदेशीर असून मसूर डाळ खिचडी, सूप, किंवा पराठ्यात सहज वापरता येते. नियमित सेवन केल्यास शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे मिळतात व आरोग्य सुधारते. त्यामुळे आहारात मसूर डाळ जरूर समाविष्ट करावी.