माथेरान (Matheran) हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, राज्यभरातून तसेच देशभरातून हजारो पर्यटक येथे भेट देतात. मात्र, माथेरान बेमुदत बंद 18 मार्च 2025 पासून राहणार आहे. स्थानिक नागरिकांनी पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणूक थांबवण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. माथेरानमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या फसवणुकीच्या तसेच लुटीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे माथेरानची बदनामी होत आहे.
पर्यटकांची वाढती फसवणूक – बंदचा निर्णय का?
माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांना फसवून, त्यांची दिशाभूल केली जाते. त्यामुळे माथेरानची बदनामी होत आहे. या बदनामीचा माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. माथेरान बचाव संघर्ष समितीने याविरोधात प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने स्थानिकांनी माथेरान बंदचे हत्यार उपसले आहे. “जोपर्यंत माथेरान प्रशासन पर्यटकांची दिशाभूल करणाऱ्या घोडेवाल्यांवर कारवाई करत नाही, तोपर्यंत माथेरान बेमुदत बंद राहील.” – माथेरान बचाव संघर्ष समिती
प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर स्थानिकांची नाराजी
माथेरानमध्ये व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांनी 27 फेब्रुवारीला महसूल विभाग, नगरपालिका, वन विभाग आणि पोलीस प्रशासन यांना आंदोलनाबाबत निवेदन दिले होते. या संदर्भात झालेल्या बैठकीत प्रशासनाने स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पर्यटकांची दिशाभूल केली जाते. तसेच सुरक्षिततेच्या नावाखाली पैसे उकळले जातात. याशिवाय बेकायदेशीर व्यवसाय वाढत आहेत.
18 मार्चपासून माथेरानमध्ये कोणतेही व्यावसायिक व्यवहार होणार नाहीत. हॉटेल इंडस्ट्री, ई रिक्षा संघटना, व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संस्था यांनी त्यास येथील समर्थन दिले असून जोपर्यंत स्थानिक प्रशासन लेखी स्वरूपात केलेल्या मागण्या कायमस्वरूपी पूर्ण करत नाही, तोपर्यंत हे पर्यटनस्थळ बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
You Might Also Like
कोणत्या आहेत मागण्या?
मिनी ट्रेन बंद असून ई रिक्षाची सेवा फक्त स्थानिकांना दिली जाते, अशी खोटी माहिती देऊन स्वतःच्या घोड्यावर बसवून पर्यटकांची दिशाभूल करून जास्तीची रक्कम उकाळली जाते.त्यासाठी दस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले किंवा कुली, रूम्सचे एजंट, रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये. माहिती फलक जागोजागी लावण्यात यावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. या स्वरूपाची मागणी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने फेब्रुवारीच्या २७ तारखेला मागणी केली होती.