आजच्या डिजिटल युगात सगळ्याच सवयी बदलल्या आहेत. तासनतास मोबाईल आणि लॅपटॉप तर अगदी कॉमन झाला आहे. यांमुळे आरोग्यावर मात्र अतिशय वाईट परिणाम होत आहे. वेळेवर जेवण होत नाही. झोपही पुरेशी होत नाही. याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर (Mental Health) होऊ लागला आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नुकताच एक अभ्यास करण्यात आला. यानुसार जे लोक रात्री उशिरापर्यंत जागरण करतात त्यांच्या मानसिक आरोग्याचे सर्वाधिक नुकसान होत आहे. तसेच या लोकांच्या एकूणच आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
अभ्यासात नेमकं काय
जर शरीराला पूर्ण झोप मिळाली नाही तर मेंदू योग्य पद्धतीने काम करू शकत नाही. यामुळे चिंता, नैराश्य, तणाव निर्माण होतो. तसेच स्मरणशक्ती देखील प्रभावित होते. या व्यतिरिक्त दीर्घ काळ जर कमी झोप मिळत असेल तर यामुळे मेंदूच्या काही भागात असंतुलन निर्माण होऊ शकते.
या रिसर्चमध्ये सहभागी झालेल्या लोकांना तीन गटात विभागण्यात आले. यामध्ये जवळपास 75 हजार लोकांच्या स्लीप पॅटर्नवर नजर ठेवण्यात आली. पहिल्या गटात लवकर झोपी जाणारे, दुसऱ्या गटात योग्य वेळी झोपी जाणारे तर तिसऱ्या गटात उशीरा झोपणाऱ्या लोकांना सहभागी करण्यात आले होते. या तिन्ही गटांतील लोकांच्या मेंटल हेल्थवर वेगवेगळा परिणाम दिसून आला.
चांगली झोप येण्यासाठी काय करावे?
मेंटल हेल्थ फाउंडेशननुसार प्रत्येक व्यक्तीने त्याच्या झोपेच्या गुणवत्तेवर काम करायला हवे. तसेच झोप का येत नाही आणि उशिरापर्यंत जागरण करण्याचे कारण काय याचाही विचार झाला पाहिजे. यावर मार्ग निघाल्यावर चांगली झोप येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. चांगली झोप येण्यासाठी चार घटक महत्वाचे ठरतात. यामध्ये सुधारणा करून या समस्येवर मार्ग काढता येऊ शकतो.
बेडरूममध्ये टिव्ही किंवा रेडिओ यांसारख्या वस्तू ठेऊ नयेत. तसेच मोबाईल फोन देखील दूर ठेवला पाहिजे. जे लोक रात्री खूप जागरण करतात किंवा उशिराने झोपतात त्यांच्यात मेंटल हेल्थ डिसऑर्डरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. यामध्ये एंग्जायटी आणि डिप्रेशन यांचा देखील समावेश आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जर रात्री लवकर झोपण्याची सवय लावायची असेल तर त्यासाठी जेवणात हलके अन्न खावे लागेल. यामुळे लवकर झोप येण्यास मदत होईल.