मुंबईसह ठाणे, वसई-विरार आणि नवी मुंबईकरांसाठी (Metro) दिलासादायक बातमी आहे. महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) लवकरच 4 नव्या मेट्रो (Metro) मार्गिकांची सुरूवात करणार आहे. त्यामुळे या परिसरातील लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायक होणार आहे. या प्रकल्पांमध्ये 38 किमी लांबीच्या मार्गिकांवर एकूण 15 स्थानकांची उभारणी होणार असून यासाठी 18 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे.
वसई-विरारमध्ये रिंगरोडसह रस्ते विकास
सध्या या प्रकल्पांना पर्यावरण मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे मेट्रो मार्ग 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) चा विस्तार होणार असून, तो कल्याणच्या दुर्गाडी ते उल्हासनगरपर्यंत नेण्यात येणार आहे. याशिवाय गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) पर्यंत मेट्रो मार्ग 10, तसेच शिवाजी चौक (मीरा रोड) ते विरारपर्यंत मेट्रो मार्ग 13 आणि कांजूरमार्ग ते बदलापूर असा मेट्रो मार्ग 14 हाती घेण्यात आला आहे.
वसई-विरार परिसरात मेट्रोबरोबरच रस्ते आणि पूल विकासाचाही मोठा कार्यक्रम आखण्यात आला आहे. येथे 40 मीटर रुंदीचा रिंगरोड तयार करण्यात येणार असून, तो परिसरातील चार मुख्य शहरे आणि आजूबाजूच्या गावांना जोडेल. याशिवाय 5 रेल्वे ओव्हर ब्रीजचे बांधकामही या प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळेल.
एमएमआर क्षेत्राचा पायाभूत विकास वेगाने होणार
ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर गायमुख ते फाउंटन जंक्शनपर्यंत भुयारी मार्ग तसेच फाउंटन जंक्शन ते भाईंदरपर्यंत उन्नत मार्गाची निर्मिती होणार आहे. दरम्यान, ऐरोली बोगदा ते कटाई नाका (भाग 3) या 6.71 किमी रस्त्याचाही प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या सर्व कामांमुळे संपूर्ण एमएमआर क्षेत्राचा पायाभूत विकास वेगाने होणार आहे.