Mohsin Mujawar:धार्मिक तेढ आणि देशविरोधी पोस्ट प्रकरणी तुर्भेहून अटक

माय मराठी
2 Min Read

पेण, १२ मे (अरविंद गुरव)

भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पेण येथील मोसिन मुजावर  (Mohsin Mujawar) (वय २३) याने सोशल मीडियावर देशविरोधी आणि धार्मिक तेढ वाढवणारी चिथावणीखोर पोस्ट केल्याने संपूर्ण पेण शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या पोस्टमुळे धार्मिक सलोख्याला बाधा येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

३ एप्रिल रोजी मोसिन मुजावर (Mohsin Mujawar) याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून “इंडिया के रुल्स की तहेस नहेश हो गई है…” असा मजकूर पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये तलवारी, बॉम्ब, मिसाईलसारख्या शब्दांचा उल्लेख करून इराणचे संदर्भ दिले गेले. “एक दिन इंडिया भी हमारा होगा…” अशा स्वरूपाच्या विधानांमुळे त्याने उघडपणे भारताच्या सार्वभौमत्वाविरोधात उघडपणे अपप्रचार केला होता.

या प्रकारामुळे शहरातील सर्वच धर्मीयांमध्ये रोष पसरला होता. सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष साईराज कदम यांच्या पुढाकाराने आयुष किरण शहा यांनी ९ मे रोजी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीरता लक्षात घेता, पेण पोलिसांनी तत्काळ कारवाईला सुरुवात केली.

पोलिसांनी इन्स्टाग्राम पोस्टचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीच्या लोकेशनचा शोध घेतला. पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक समद बेग यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने, ज्यामध्ये पो.हे.कॉ. अजिंक्य म्हात्रे, अमोल म्हात्रे, सुशांत भोईर, संतोष जाधव, राजा पाटील, प्रकाश कोकरे, सचिन वासकोटी, गोविंद तलवरे आदींचा समावेश होता, त्यांनी सोमवारी पहाटे नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थानकावरून मोसिनला अटक केली.

या प्रकरणी आरोपी मोसिन मुजावर विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३५३(१)(ख) व ३५३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल, सोशल मीडिया खात्यांची सखोल चौकशी सुरू केली असून, यामध्ये अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, हे तपासले जात आहे.

या प्रकारामुळे सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत जनजागृती होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. युवकांनी सोशल मीडियावर विचारपूर्वक पोस्ट करणे आवश्यक आहे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more