मुंबईत (Mumbai) होळी-धुलीवंदनाला डीजे आणि लाऊडस्पीकर बंदी; आदित्य ठाकरे काय म्हणाले वरळी कोळीवाड्यात होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. काही ठिकाणी पोलीस प्रशासनाने नोटीस जारी केली असून, काही ठिकाणी तोंडी सूचना देत कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. ध्वनी प्रदूषणाचे कारण देत यंदा पोलिसांनी या पारंपरिक उत्सवासाठी डीजे आणि लाऊडस्पीकरला परवानगी नाकारली आहे.
वरळी कोळीवाड्यात दरवर्षी कोळी समाज पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करतो. पारंपरिक पोशाखात कोळी नृत्य सादर केले जाते, आनंदोत्सव साजरा होतो. मात्र, यंदा डीजे आणि लाऊडस्पीकरला परवानगी नाकारल्यामुळे कोळी समाज नाराज झाला आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. “सरकारला मराठी सणांविषयी एवढा आकस का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की डीजे किंवा लाऊडस्पीकरचा वापर केल्यास आयोजकांवर कारवाई केली जाईल. दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल होईल.
- पोलिसांच्या नोटीसमधील महत्त्वाचे नियम:
- ध्वनीक्षेपक परवानगी असली तरी तक्रार प्राप्त झाल्यास ती बंद करण्याचा अधिकार पोलिसांना असेल.डीजे साऊंडचा पूर्णतः वापर बंदीस्त असेल.
- ध्वनीप्रदूषण अधिनियम २००० नुसार रात्री १० वाजेनंतर लाऊडस्पीकर चालू ठेवता येणार नाही.
- पोलिसांच्या पूर्व परवानगीशिवाय ध्वनीक्षेपकाची जागा बदलता येणार नाही.
- आदेशाचे उल्लंघन झाल्यास आयोजकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
आदित्य ठाकरे यांनी या निर्णयावर आक्षेप घेत म्हणाले, “एकीकडे गणेश मंडळांवर आणि मूर्तिकारांवर कठोर नियम लादले जात आहेत, तर आता कोळी बांधवांसाठीही मर्यादा घातल्या जात आहेत.” ठाकरे गटाचा आरोप आहे की महायुती सरकार जाणीवपूर्वक मराठी सणांवर बंधने लावत आहे.