Mumbai : केंद्र सरकारने मक्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिल्यामुळे आणि पशू व कोंबडी खाद्यासाठी त्याला मोठी मागणी वाढल्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात मक्याची लागवड दुप्पटीने वाढली आहे. राज्यात यंदा ४.८४ लाख हेक्टर क्षेत्रावर मका पेरला गेला आहे. राज्यात रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून, एकूण लागवड सरासरीपेक्षा १०.५९ लाख हेक्टरने वाढली आहे. विशेषतः मक्याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी ३.३७ लाख हेक्टरवर मका पेरला गेला होता, तर यंदा हे क्षेत्र ४.८४ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. मक्याचा उपयोग पशुखाद्य, कोंबडी खाद्य आणि चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे मागील वर्षी मक्याचे दर ३० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले होते. परिणामी, शेतकऱ्यांनी मक्याची लागवड वाढवण्यास प्राधान्य दिले आहे.
राज्यात रब्बी हंगामासाठी सरासरी ५३.९६ लाख हेक्टर क्षेत्र असते. गेल्या वर्षी हे क्षेत्र ५७.८० लाख हेक्टर होते, तर यंदा ते ६४.५६ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. गव्हाच्या लागवडीत वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या १०.४८ लाख हेक्टरवरून यंदा १३.०६ लाख हेक्टरवर गेली आहे. हरभऱ्याचे क्षेत्रही वाढले असून, ते २१.५२ लाख हेक्टरवरून २८.८६ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. मात्र, ज्वारीची लागवड घटली असून, ती १७.५३ लाख हेक्टरवरून १५.४० लाख हेक्टरवर आली आहे. तसेच, तेलबियांची लागवडही थोडी कमी झाली आहे.
केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे मक्याच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. तसेच, कडधान्य व तेलबियांच्या तुलनेत मक्याला अधिक चांगला दर मिळत असल्याने शेतकरी मक्याची लागवड अधिक करत असल्याचे कृषी संचालक रफीक नाईकवाडी यांनी सांगितले.