कल्याण (Kalyan) – टिटवाळा आणि बल्याणी भागातील तसेच डोंगरवाली मैय्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा चाळी उभारल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने मंगळवारी मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ६० बेकायदा चाळी आणि त्यांची बांधणी सुरू असलेल्या जोत्यांवर बुलडोझर चालवण्यात आला.
अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना बल्याणी भागात गुपचूप बेकायदा चाळी बांधल्या जात असल्याची माहिती मिळाली. तपासात असे समजले की, डोंगरवाली मैय्या मंदिर परिसरात आणि बल्याणी टेकडीवर ६० हून अधिक चाळींसाठी जोत्यांचे बांधकाम सुरू होते. यामुळे तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सकाळी महापालिका अधिकाऱ्यांसह तोडकाम पथक, जेसीबी मशीन आणि पोलिस बंदोबस्त घेऊन ही कारवाई करण्यात आली. अचानक सुरू झालेल्या या कारवाईने भूमाफियांमध्ये प्रचंड खळबळ माजली आणि ते पळून गेले.
रेशन धारकांसाठी मोठी बातमी, आता KYC करा …
बल्याणी टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणावर सरकारी आणि वनजमीन आहे. भूमाफियांनी या जमिनींवर कब्जा मिळवण्यासाठी चाळी उभारण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी आधी जोत्यांचे बांधकाम केले जात होते, जेणेकरून भविष्यात येथे चाळी उभारता येतील. या भागात अनेकजण जमीन हडप करण्यासाठी स्पर्धा करत होते, असे स्थानिकांनी अधिकाऱ्यांना सांगितले. गेल्या दीड महिन्यापासून टिटवाळा, मांडा, अटाळी, मोहने परिसरात बेकायदा बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू आहे. या मोहिमेद्वारे सुमारे १५०० हून अधिक बेकायदा चाळी, जोते आणि व्यापारी गाळे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. स्थानिकांच्या मते, टिटवाळ्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामांवर कारवाई केली जात आहे.
ही बेकायदा बांधकामे प्रामुख्याने राजकीय नेत्यांच्या पाठिंब्यावर उभी राहिली होती. मात्र, कारवाईला भीतीपोटी आता हे सर्व लोक गायब झाले आहेत. जो कोणी सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. बेकायदा बांधकामधारकांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्याअंतर्गत (MRTP Act) गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.