“मी १०० टक्के म्हणू शकतो की धनंजय मुंडे (Dhananjay Munde) गुन्हेगार नाहीत. धनंजय मुंडे यांनी खूप त्रास सहन केला आहे. जर ते आपल्या अध्यात्माच्या क्षेत्रात असते तर ते संतपदापर्यंत पोहोचले असते,” असे भगवान बाबा गडचे महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri) यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा देत म्हटले आहे. अशी धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेले वक्तव्य केल्यानंतर महंत नामदेव शास्त्रींवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. अनेक बड्या नेत्यांनी देखील शास्त्री यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे मॉर्फ केलेले शास्त्रीचें फोटो पाहायला मिळत आहेत.
आपल्या कीर्तन आणि प्रवचनामुळे आताच्या पिढीमध्ये देखील बऱ्यापैकी प्रचलित असलेले नामदेव शास्त्री यांनी आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेत प्रारंभिक शिक्षण घेतले. त्यानंतर, श्रीगुरू श्री १००८ स्वामी काशिकानंदगिरीजी महाराज यांच्या आनंदवन आश्रम, कांदिवली, मुंबई येथे गुरुकुल पद्धतीने ९ वर्षे न्यायशास्त्राचे शिक्षण घेऊन वाराणसी विद्यापीठाची ‘न्यायाचार्य’ ही पदवी संपादन केली. तसेच, पुणे विद्यापीठातून एम.ए. (मराठी) पूर्ण करून, ‘वारकरी संतांची काव्यरचना’ या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली.
सध्या, नामदेव शास्त्री हे श्री क्षेत्र भगवानगड संस्थानचे प्रमुख मठाधिपती आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, गडाच्या विकासासाठी ६० फूट उंच महाद्वार, सभामंडप, भव्य वाचनालय, अतिथी निवास, उद्यान, ध्यानधारणा केंद्र, संग्रहालय, इंग्रजी शाळा आणि हेलिपॅड यांसारख्या विविध प्रकल्प राबविले जात आहेत.
त्यांची प्रवचने आणि कीर्तने ज्ञानेश्वरीवरील आहेत, ज्यामध्ये ते आध्यात्मिक आणि मानसिक विकासासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करतात. त्यांचे ज्ञान पारंपारिक असूनही,आधुनिक काळातही लागू होते.