महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Yojana) सुरू केली आहे. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 अनुदान दिले जाते. तसेच, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेतून देखील शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 मिळतात. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दोन्ही योजनांमधून एकत्रितपणे ₹12,000 वार्षिक मदत मिळत आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना अधिक आर्थिक आधार मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये ₹3000 वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे एकूण रक्कम ₹15,000 होण्याची शक्यता आहे. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी या घोषणेकडे उत्सुकतेने पाहत आहेत. महाराष्ट्र सरकारने 2023-24 पासून ही योजना राबवायला सुरुवात केली. ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यातील 91.45 लाख शेतकऱ्यांना ₹9055.83 कोटी अनुदान मिळाले आहे. योजनेचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan)केंद्र सरकारने 2018-19 मध्ये अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली. योजना सुरू झाल्यापासून ऑक्टोबर 2024 पर्यंत महाराष्ट्रातील 117.55 लाख शेतकऱ्यांना ₹33,468.55 कोटींचा लाभ मिळाला आहे. पहिल्यापासून लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना 19 हप्त्यांमध्ये ₹38,000 मिळाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नमो शेतकरी निधीत वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातून याची अधिकृत घोषणा होते का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे