नवी मुंबईतील (Navi Mumbai) सिडको भवनात काम करणाऱ्या ३५० कंत्राटी कामगारांना जानेवारी महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. २८ फेब्रुवारी उजाडला तरी त्यांच्या खात्यात पगार जमा झाला नाही, त्यामुळे या कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला वारंवार सूचना दिल्या, नोटीसही पाठवली, पण त्याने दोन दिवसांत वेतन देण्याचे दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण केलेले नाही.
दुसरीकडे, सिडकोच्या कायमस्वरूपी ७५० कर्मचाऱ्यांना आणि ३०० अधिकाऱ्यांना महिनाअखेरच्या आधीच पगार मिळाल्याचे लघुसंदेश त्यांच्या मोबाइलवर आले. त्यामुळे एकाच कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये होणाऱ्या भेदभावाविषयी संताप व्यक्त केला जात आहे. सिडको भवनात लिपिक, टंकलेखक, वाहक, शिपाई आणि अग्निशमन कर्मचारी यांसारख्या पदांवर प्रकल्पग्रस्त कंत्राटी कामगार अनेक वर्षांपासून काम करत आहेत. जानेवारीमध्येच (१६ जानेवारी) कामगारांनी कामबंद आंदोलन करून वेतन प्रश्नावर आवाज उठवला होता. त्यानंतर मुंबई लेबर युनियनच्या मध्यस्थीने सिडकोच्या कार्मिक विभागाने लवकरच वेतन मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, वेळोवेळी आश्वासन दिले गेले तरी प्रत्यक्षात काहीच झाले नाही.
याप्रकरणी सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी सिडकोच्या कार्मिक विभागप्रमुख प्रमदा बिडवे यांच्याकडून माहिती मागवली. मात्र, कंत्राटदाराकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. सिडकोच्या नोटीस प्रक्रियेलाही तो गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे कंत्राटी कामगार संतप्त झाले आहेत. सिडकोने कंत्राटदाराला वेतन देण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, वेतन प्रक्रियेला गती देण्यात येत आहे. मात्र, कामगारांना वेळेवर पगार मिळेल का? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कामगारांचे वेतन देण्याची मागणी केली जात आहे.