सध्याचं युग हे स्पर्धेचं आहे, आणि यामध्ये कोणतेही दुमत नाही. आपण सध्या राहात असलेल्या घरापेक्षा अधिक चांगलं घर असावं (New Home) सर्व सुखसोयी एकाच जागेवर असाव्यात या विचारामध्ये प्रत्येकजण गुंतलेला आहे. प्रत्येकवेळी स्पर्धा ही कोणा दुसऱ्यासोबतच असली पाहिजे असं काही नाही, काहीवेळेस ती स्वतःसोबत देखील असते.
चाळीमध्ये बालपण गेलेल्या तरुणाला बिल्डिंगमध्ये राहायला जावंस वाटतं…बिल्डींगमध्ये राहायला असलेल्या व्यक्तीला आता मोठ्या टॉवरमध्ये जावंस वाटत, टॉवरमध्ये असलेल्या आता अधिक सुखसोयी असलेल्या टाऊनशिपमध्ये जावस वाटत.. आणि यासाठी ते कष्टदेखील करत असतात. मात्र या स्वप्नांचा पाठलाग करताना फक्त पैसे असून चालत नाही तर त्यासोबत योग्य व अचूक माहिती असणं आजच्या जगात खूप महत्वाचे झाले आहे.
घर खरेदी हा आयुष्यातील एक मोठा निर्णय असतो. पहिल्यांदा घर खरेदी करताना काही सामान्य चुका केल्या जातात, ज्या भविष्यात महागात पडू शकतात. शिवाय त्या चुका बदलता येणं देखील कठीण होऊन बसतं त्यामुळेच आपण आजच्या या लेखामध्ये अशा काय १० चुका आहेत ज्या प्रत्येक नवीन घर घेणाऱ्यांनी टाळल्या पाहिजेत यावर माहिती देणार आहोत.
बजेट न ठरवता घर शोधणे
बऱ्याचदा असं होतं की, आपण जाहिरात बघून किंवा नातेवाईक किंवा मित्राने त्या प्रोजेक्ट्मध्ये घर घेतलं म्हणून आपण देखील तिकडे जाणं पसंत करतो, अशावेळी आपण त्यांची मासिक मिळकत त्यांची आधी असलेली सेविंग त्यामुळे त्यांना तिकडे घेणं शक्य झालं असेल याचा विचार न करता ब्रोकरने आपल्या सोयीनुसार मिळवून दिले म्हणून खुश असतो. पण मग जेव्हा EMI देण्याची वेळ येते तेव्हा मग सर्व बजेट कोलमडतं. त्यामुळे आधी आपले बजेट आधी पूर्णपणे ठरवून सर्व शक्यता पडताळणी करूनच आपल्या स्वप्नातील घरासाठी पुढाकार घ्यावा.
गृहकर्जाच्या पर्यायांची तुलना न करणे
सर्वसामान्य माणूस त्यांच्या आयुष्यात एकदा किंवा जास्तीत जास्त दोनदा गृह कर्जाच्या फंदात पडत असतो. मात्र ते देखील करत असताना आर्थिक निकषांचे अनुमान न लावता मिळेल त्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून गृहकर्ज घेण्याकडे त्यांचा कल असतो. अशावेळी बाजारामध्ये अन्य देखील चांगले पर्याय उपलब्ध आहेत, जिथे आपले नुकसान कमी होणार आहे याची माहिती इतक्या उशिरा मिळते की त्या विचारात पश्चाताप करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच नसतो. शिवाय आपण घेतलेल्या घर किंवा प्रॉपर्टीच्या किमतीपेक्षा व्याजदर, प्रोसेसिंग फी, कर्जाचा कालावधी आणि अटी-शर्ती जेव्हा समोर येतात तेव्हा त्याला आपला निर्णय चुकला की काय असा विचार सातत्याने त्रास देत राहतो. त्यामुळे सर्व माहिती घेऊनच आपली कर्जाची फाईल पुढे करा.
लोकेशन नीट विचारात न घेणे
You Might Also Like
केवळ कमी किंमतीमध्ये मिळतंय म्हणून लोकेशनची निवड करणे आणि नंतर वाहतूक, शाळा, दवाखाने आणि बाजारपेठेच्या गैरसोयींमुळे त्रास होणे. हा प्रकार तर ७०% लोकांच्या बाबतीत होताना दिसतो. ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणापासून घर किती लांब आहे, आपल्याला नेहमी ये-जा करण्यासाठी या ठिकाणी काय सावर्जनिक वाहतूक सुविधा आहे, ट्रॅफिकच्या समस्येची काय स्थिती आहे. परिसरातील मूलभूत सुविधा जसे की रस्ते, पाणीपुरवठा, वीज, सार्वजनिक वाहतूक, सुरक्षेची स्थिती याची माहिती प्राथमिकतेने घेणं खूप गरजेचे आहे, नाही तर असेल त्या समस्येना सामोरे जाण्याची तयारी करावी लागेल.
बांधकाम गुणवत्ता आणि दस्तऐवज न तपासणे
बऱ्याचदा लोकं घर घेताना समोरच्या सांगणाऱ्यावर अंध विश्वास ठेवताना दिसतात. त्यामुळे त्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टी जेव्हा पूर्ण झालेल्या नसतात तेव्हा नात्यामध्ये देखील दुरावा आल्याचे निदर्शनास येते. बिल्डर किंवा एजंटच्या सांगण्यावरच विश्वास ठेवणे आणि प्रत्यक्ष बांधकामाची तपासणी न करणे हे अंगलट येऊ शकते. यावर तोडगा असा कि, घराच्या भिंती, वीज व पाणीपुरवठा, पार्किंग, आणि अन्य सुविधा स्वतः तपासण्यावर प्राधान्य द्यावे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे बिल्डर RERA नोंदणीकृत आहे का? हे तपासणे सध्या अधिक महत्वाचे बनले आहे.
आरईआरए (RERA) नोंदणी तपासणी
अनेक जणांसाठी कदाचित हा शब्द नवीन असेलही पण जेव्हा तुम्ही घर घेण्याच्या तयारीला लागाल तेव्हा तुमची या शब्दाशी गाठ पडू शकते. RERA हा एक प्रकारचा कायदा आहे त्याची जनहितासाठी नियमावली आहे. काही बिल्डर RERA कायद्याचे पालन करत नाहीत, त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. तुमचे हक्काचे घर मिळण्यास विलंब लागू शकतो. त्यामुळे RERA वेबसाइटवर जाऊन तुम्ही घेत असलेल्या प्रकल्पाची नोंदणी आणि प्रगती नक्की तपासा. आपल्या महाराष्ट्रासाठी http://maharera.mahaonline.gov.in (https://maharera.mahaonline.gov.in) या संकेतस्थळांचा वापर करू शकता.
केवळ डाउन पेमेंट आणि गृहकर्जाचा EMI विचार करणे
९० टक्के लोक घर घेतल्यानंतर या समस्येमधून जाताना दिसतात ते म्हणजे केवळ गृहकर्जाचा मासिक हफ्ता बघून निर्णय घेणे आणि इतर खर्च दुर्लक्षित करणे. सध्या आपण जे आयुष्य जगात आहोत त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, प्रवास व बचत असे अनेक खर्च हे प्राथमिकेमध्ये मोडतात अशा वेळी फक्त होम लोन देण्याइतके पैसे येत आहेत.. पगार नंतर वाढेलच हा अभिर्भाव अनेकवेळा नडताना दिसतो. शिवाय घराच्या किमतीशिवाय स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, मेंटेनन्स खर्च, इंटिरिअर डिझाइन यांसारखे अतिरिक्त खर्च लक्षात घेतले पाहिजेत.
भविष्यातील गरजा विचारात न घेणे
फक्त सद्यस्थिती चांगली आहे हे पाहून घर खरेदी करणे आणि भविष्यातील गरजा न विचारात घेणे हे एक कारण पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकते. तुमच्या कौटुंबिक गरजा मुले, वयोवृद्ध पालक, कामाच्या बदलत्या संधी याचा एक आढावा घेऊन पुढचे पाऊल टाकले पाहिजे. आपण घेत असलेल्या प्रॉपर्टीची भविष्यातील विक्री/भाड्याने देण्याची क्षमता लक्षात घेणे एका चांगल्या व्यवहाराचे लक्षण ठरू शकतं.
पुनर्विक्री मूल्य (Resale Value) विचारात न घेणे
घर घेतले म्हणजे आता मरेपर्यंत आपण तिथून काही हलणार नाही अशा विचारात आपण घर घेत असतो. काही ठिकाणी घर घेताना त्याच्या भविष्यातील किंमतीचा अंदाज घेत नाहीत, त्यामुळे नंतर विकताना नुकसान होते. परिसरातील मागणी, प्रकल्पाचे स्थान आणि भविष्यातील विकास योजना समजून घेणे फायदेशीर ठरू शकते.
कायदेशीर कागदपत्रे नीट न वाचणे
विकसक किंवा एजंटवर विश्वास ठेवून सर्व कागदपत्रे नीट न वाचता सही करणे जोखमीचे ठरू शकते. गृहकर्ज मंजुरी पत्र, बिल्डरचे क्लिअरन्स सर्टिफिकेट, ताबा प्रमाणपत्र (Occupancy Certificate), सातबारा उतारा, RERA प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे तपासा, तुम्हाला शक्य नसल्यास कायदेशीर सल्लागाराची मदत नक्की घ्या.
घाईगडबडीत निर्णय घेणे
बऱ्याच वेळा आकर्षक ऑफर किंवा डिस्काउंट पाहून किंवा एजंटच्या दडपणामुळे घाईत घर खरेदी करतात. अशी संधी परत मिळणार नाही असे बऱ्याचदा सांगितले जाते. अनेक गोष्टी अशावेळी लपवल्या जातात. त्यामुळे किमान २-३ पर्यायांचा अभ्यास करा आणि नंतर निर्णय घ्या. लिमिटेड टाइम ऑफर” किंवा “तुरंत बुक करा” यांसारख्या युक्त्यांना बळी पडू नका.
पहिल्यांदा घर खरेदी करताना योग्य नियोजन आणि बारकाईने पाहणी केली तर मोठ्या अडचणी टाळता येतात. योग्य बजेट, लोकेशन, कायदेशीर कागदपत्रे, पुनर्विक्री मूल्य आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन निर्णय घेतल्यास तुम्ही चांगली गुंतवणूक करू शकता.
Vikrant Nalawade
9867904334