Pahalgam Attack : ह्रदयद्रावक ३ दिवसांपूर्वी लग्न आणि फिरायला गेल्यावर झालेल्या हल्ल्यात जोडीदाराला गमावले

माय मराठी
3 Min Read

काल रात्री संपूर्ण देश शांत झोपू शकला नाही. प्रत्येकाच्या काळजाला चर्र करणारी घटना काल (Pahalgam Attack) पहलगाममध्ये घडली. सर्व पर्यटकांचा आक्रोश असणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर तर अजूनच मन सुन्न झाले. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एकूण २६ जणांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, ओडिशा आणि इतर राज्यांतील पर्यटक मृत्युमुखी पडले. येथे अनेक पर्यटक अडकले आहेत. त्यापैकी अनेक जण सुरक्षित असल्याचे वृत्त आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी प्रथम परिसराचा आढावा घेतला. नंतर त्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. यामध्ये भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल शहीद झाले.

नुकतंच लग्न झाले आणि…

विनय नरवाल हे करनालमधील सेक्टर ७ चे रहिवासी होते. ते दोन वर्षांपूर्वी नौदलात सामील झाले होते. विनय सोमवारी श्रीनगरमध्ये फिरायला गेले होते. त्यांची पत्नी या हल्ल्यातून वाचली. सोमवारी हे जोडपे श्रीनगरला पोहोचले. तेथून ते पहलगाममध्ये फिरायला गेले. या घटनेनंतर त्यांच्या पत्नीचा पतीच्या मृतदेहाजवळ बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यांचे कुटुंब करनालमधील सेक्टर ७ मध्ये राहते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबातील सदस्य श्रीनगरला रवाना झाले.


आम्ही येथे भेलपुरी जेवत होतो. त्यावेळी एक व्यक्ती हातात बंदूक घेऊन आला. त्याने माझ्या पतीला विचारले की तो मुस्लिम आहे का? तो मुस्लिम नसल्याचे लक्षात येताच त्याने त्याच्यावर गोळी झाडली, नरवालच्या पत्नीने थरथरत्या आवाजात घटना सांगितली. दरम्यान, मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हैदराबाद येथील आयबी अधिकारी मनीष रंजन हेही शहीद झाले. त्यांच्या मुलांसमोर आणि पत्नीसमोर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हल्ल्याच्या काही वेळ आधी कुटुंब तिथे पोहोचले होते.


घटनास्थळावरून आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात एक महिला रडताना दिसत आहे. ती मदत मागत आहे. पण रडण्याने आणि भावनांमुळे तिचा आवाज कमकुवत आहे. ती माझ्या पतीला वाचवण्याची विनंती करत आहे. तर तिचा पती रक्ताच्या थारोळ्यात जवळच दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक महिला मदत मागतानाही दिसत आहे. या दहशतवादी हल्ल्याचा दावा लष्कर-ए-तैयबाच्या संघटनेच्या द रेझिस्टन्स फ्रंट टीआरएफने केला आहे.

महाराष्ट्रातील ६ नागरिकांचाही समावेश

या दहशतवादी हल्ल्यामुळे अतिशय भयावह वातावरण निर्माण झाले आहे आणि काश्मीरला भेट देण्यासाठी गेलेले अनेक पर्यटक घाबरले आहेत आणि लवकरात लवकर घरी परतण्यास उत्सुक आहेत. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील ६ नागरिकांचाही समावेश आहे, त्यापैकी २ पुण्याचे, ३ डोंबिवलीचे आणि एक नवी मुंबईचा आहे.

दरम्यान, अशी माहिती समोर आली आहे की महाराष्ट्रातील काही नागरिक या हल्ल्याच्या वेळी पहलगाममध्ये होते परंतु सुदैवाने बचावले आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अमरावतीचे ११ लोकही तिथे होते. गोळीबाराच्या काही मिनिटांपूर्वीच हे सर्वजण तेथून निघून गेले होते. सध्या हे सर्वजण सुरक्षित आहेत आणि श्रीनगरमधील हॉटेल डेव्हलपमेंट लँडमध्ये राहत आहेत.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more