धुळवडीलाच महागाईने डोके वर काढले आहे. धुळवडीला सोने आणि चांदीच नाही तर दैनंदिन गरजेच्या वस्तूमध्ये पण मोठी वाढ (Price Hike Impact) झाली आहे. मटण आणि चिकनचे भाव गेल्यावर्षी पेक्षा मोठी वाढ झाली. तर दुसरीकडे दुधाच्या किंमतींना पण दरवाढीची उकळी फुटली आहे. त्यामुळे खवय्यांची पंचाईत झाली आहे. घरातील शाकाहारी आणि मांसाहारी दोघांनाही महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. इतके दर वधारले आहेत.
बर्ड फ्लूच्या सावटामुळे कोंबडीकडे पाठ
मुंबईत मटण ८०० ते ८५० रुपये किलो इतके झाले. प्रती किलोमागे ५० ते १०० रुपये वाढ झाली. ठाणे, पुणे आणि नागपूरमध्ये सुद्धा मटण आणि चिकनाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे काल दिसून आले. काल नालासोपारासह विविध शहरात मटण खरेदीसाठी सकाळपासूनच मोठी रांग दिसून आली. धुळवडीच्या दिवशी तिखट जेवणावळीचा बेत आखलेल्या अनेक मांसाहारींना मटण खरेदीसाठी प्रति किलो ८५० रुपये मोजावे लागले. अनेकांनी बर्ड फ्लूच्या सावटामुळे कोंबडीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी मुंबईत मटणाच्या मागणीत वाढ झाली. त्यामुळे मटणाच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली.
शेळी पालनाऐवजी फळ आणि पालेभाज्यांची पिके घेण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. शेळी पालनात झालेली घट, प्रजनन कालावधीपूर्वीच बोकड आणि मेंढ्यांची होणारी विक्री, मागणीच्या तुलनेत कमी झालेला पुरवठा, तसेच काही भागात पसरलेली बर्ड फ्लूची साथ अशा विविध कारणांमुळे मटणाची मागणी वाढल्याचे समोर आले आहे. मागणी वाढल्याने मग दुकानदारांनी मटणाच्या किंमती वाढवल्या. त्यामुळे ग्राहकांना मटण ८०० ते ८५० रुपये किलो दराने विकत घ्यावे लागले.
दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ
मटणच नाही तर आजपासून सर्व दूध केंद्रावर दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ झाली. उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे. आईसस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे.
You Might Also Like
नवी दरवाढ आज, शनिवारपासून लागू होणार आहे. पुण्यातील कात्रज दूध संघात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक संघटनेचे ४७ सदस्य उपस्थित होते. गाय आणि म्हशीच्या दूध दरात या बैठकीत प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दूध भेसळ आणि पनीर भेसळ रोखण्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. भेसळ आणि शेतकर्यांचे थकीत अनुदान लवकरात लवकर मिळण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव मस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ आदींनी यांनी दिली.