Pune : पुण्यातील कोथरूड येथील चांदणी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फूट उंच स्वराज्यनिर्मिती शिल्प पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने मंजूर केला आहे. याआधी येथे २० फूट उंच पुतळा उभारण्याचा प्रस्ताव होता, मात्र आता हा पुतळा अधिक भव्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
या शिल्पाच्या उभारणीसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रस्ताव दिला होता. आधीच्या आराखड्यानुसार, १७ फूट उंचीच्या चबुतऱ्यावर २० फूट उंचीचा ब्राँझ धातूमधील पुतळा बसवला जाणार होता, ज्यासाठी २,४५० किलो धातूचा वापर होणार होता. मात्र, शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी केली होती. तसेच, परिसरात ४५ मीटर उंचीचा झेंडा, दगडी भिंती आणि फुलझाडांनी सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
नवीन आराखड्यानुसार या प्रकल्पासाठी ७ कोटी ६० लाख ३२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, जो पूर्वीच्या ७८ लाख ४० हजार रुपयांच्या अंदाजापेक्षा मोठा आहे. हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठवला जाणार आहे. चांदणी चौकातील नव्याने तयार झालेल्या उड्डाणपुलाच्या जवळ, साडेपाच हजार चौरस मीटर जागेत हे शिल्प उभारले जाणार आहे.