Pune : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) चा आणखी एक रुग्ण दगावला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५९ वर्षीय पुरुषाचा मंगळवारी (११ फेब्रुवारी) मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील GBS मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ८ वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात जीबीएस रुग्णांची संख्या एकूण २०३ वर पोहचली आहे.
५९ वर्षीय रुग्ण पुण्यातील खडकवासला येथील संत रोहिदास नगरमधील रहिवासी होता. त्याला १० फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला प्रचंड अशक्तपणा जाणवत होता आणि शरीर हलवणेही कठीण झाले होते. नर्व्ह कंडक्शन व्हेलोसिटी चाचणीत GBS असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत २०३ GBS रुग्ण आढळले असून, त्यातील १७६ जणांचे निदान निश्चित झाले आहे. पुण्यातील रुग्णसंख्या वाढत असून, आतापर्यंत पुणे शहरात ४१, नव्याने समाविष्ट गावांमध्ये ९४, पिंपरी-चिंचवडमध्ये २९ आणि पुणे ग्रामीण भागात ३१ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांत ८ रुग्ण आढळले आहेत.
GBS रुग्णांवर उपचाराची स्थिती
➡ ५२ जण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.
➡ २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
➡ १०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
GBS च्या रुग्णसंख्येत वाढ सुरू असून, आरोग्य विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.