Pune tourism : पुणे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक साधनांच्या मदतीने समग्र पर्यटन आराखडा तयार केला जाणार आहे. या आराखड्यात ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रे, नद्या, वन्यजीव, जैवविविधता, धरणे, कृषी आणि वन पर्यटन, जलक्रीडा, साहसी खेळ, पक्षी निरीक्षण व गवताळ प्रदेश सफारी यांचा समावेश केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात बैठक पार पडली. यामध्ये विविध शासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. डुडी यांनी जिल्ह्यातील गडकिल्ल्यांकडे देश-विदेशातील पर्यटकांचे लक्ष वेधण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
पर्यटनामुळे महसूल वाढ, स्थानिकांना रोजगार आणि पारंपरिक कला-संस्कृतीला चालना मिळेल. त्यामुळे पर्यटन स्थळांची स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणावर भर दिला जाईल. पर्यटकांना प्रवास, निवास, भोजनालये, वैद्यकीय सुविधा याबाबत ऑनलाइन माहिती मिळेल, यासाठी प्रयत्न केले जातील.
येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये मोठा पर्यटन महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन असून, त्यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांना निमंत्रित करण्याचा विचार आहे. पुणे जिल्ह्याचा पर्यटन आराखडा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.