पुण्यात (Pune) फेब्रुवारी महिन्यात तब्बल १९ हजार घरांची विक्री झाली असून, त्यातील निम्म्याहून अधिक घरे ५० लाख रुपयांपर्यंतच्या किमतीची आहेत. यावरून नागरिकांचा कल परवडणाऱ्या घरांकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाइट फ्रँक इंडियाने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या ग्रामीण भागातील मालमत्तेचा फेब्रुवारी महिन्याचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, गेल्या महिन्यात १९,०१२ घरांची विक्री झाली असून, यामुळे सरकारला ७१२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले. मागील वर्षी याच महिन्यात १८,७९१ घरे विकली गेली होती आणि ६६२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क जमा झाले होते. म्हणजेच, घरांच्या विक्रीत १% आणि मुद्रांक शुल्कात ७.६% वाढ झाली आहे. विशेषतः, १ कोटीहून अधिक किमतीच्या घरांची विक्री वाढल्याने मुद्रांक शुल्काचा महसूल वाढला आहे.
घरांच्या किमतीनुसार विक्री पाहता, २५ लाख रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण २२%, २५ ते ५० लाख रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण ३०% आहे. म्हणजेच, एकूण विक्रीत ५० लाख रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण ५२% आहे. त्याचबरोबर, ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या घरांची विक्री ३२%, १ ते २.५ कोटी रुपयांपर्यंतच्या घरांची विक्री १४%, तर २.५ ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण २% आहे. ५ कोटींपेक्षा अधिक किमतीच्या घरांची विक्री १% पेक्षा कमी असल्याचे अहवालात सांगितले आहे.
घरांच्या आकारानुसार विक्रीचे प्रमाण पाहता, ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांची विक्री २३%, ५०० ते ८०० चौरस फुटांतील घरे ४५%, ८०० ते १००० चौरस फुटांतील घरे १५%, १००० ते २००० चौरस फुटांतील घरे १४% आणि २००० पेक्षा जास्त चौरस फुटांतील घरे ३% इतकी आहे.
पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे गृहनिर्माण बाजारपेठेत स्थिरता दिसून येत आहे. इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात घरे परवडणारी असल्याने येथे घर घेण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. पुण्याचा गृहनिर्माण बाजार मजबूत असून, भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष शिशिर बैजल यांनी सांगितले.