Rahul Solapurkar : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी काही दिवसा आधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी एक पोस्ट केला होता. त्या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी केलेल्या विधानामुळे आता वाद निर्माण झाला आहे. राहुल सोलापूरकर यांच्या या विधानावर सामान्य नागरिकांसह राजकीय वर्तुळातूनही टीका करण्यात येत आहे. यावर मोठा वाद सुरू झाल्यानंतर आता राहुल सोलापूरकर यांनी या विधानामागील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असतील तर ते त्याबद्दल माफी मागतात, असे त्यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
राहुल सोलापूरकर यांनी एका यूट्यूब चॅनलवरील पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काही विधानं केली. त्यांनी म्हटलं की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचं महत्त्व दाखवण्यासाठी हिरकणीची कथा तयार केली गेली आहे. अशी घटना प्रत्यक्षात कधीच घडलेली नाही. महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईच्या पेटाऱ्यात लपून नव्हे, तर लाच देऊन बाहेर पडले. त्यासाठी अनेक ठिकाणी पैसे दिल्याचे पुरावे आहेत. स्वामी परमानंद शेवटी पाच हत्ती घेऊन गेले होते, त्याचा परवाना आजही उपलब्ध आहे. इतिहास अधिक रंजक बनवण्यासाठी या गोष्टी रंगवून सांगितल्या गेल्या आहेत, त्यामुळे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचत नाही,” असा दावा सोलापूरकर यांनी केला होता.
राहुल सोलापूरकरच्या शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले या दाव्यावरून वाद निर्माण झाला. राहुल सोलापूरकर यांनी आपल्या विधानामागची भूमिका स्पष्ट करताना ‘लाच’ हा शब्द वापरल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” असा जयघोष करत एक स्पष्टीकरणात्मक व्हिडीओ देखील जारी केला आहे.
राहुल सोलापूरकर स्पष्टीकरणात्मक व्हिडीओ मध्ये म्हणाले “साधारण दीड-दोन महिन्यांपूर्वी रीमा अमरापूरकर यांच्या पॉडकास्टवर मी ५० मिनिटांची मुलाखत दिली होती. त्यात एका प्रश्नाला उत्तर देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत बोलताना मी काही गोष्टी सांगितल्या. बिकानेरच्या राजवाड्यातील काही पुरावे, राजस्थानमधील कागदपत्रे, फारसी-उर्दू ग्रंथांमधील माहिती आणि औरंगजेबाच्या जवळच्या लोकांकडील काही संदर्भ मी वाचले होते. त्यावर आधारित काही गोष्टी मी मांडल्या. महाराजांनी काही लोकांना रत्न, पैसे दिले होते, असं सांगताना आणि महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारातील लोकांना आपल्या बाजूने कसं वळवून घेतलं, हे स्पष्ट करताना मी ‘लाच’ हा शब्द वापरला,” असं त्यांनी सांगितलं.