Raja Shivaji : महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. त्याचे वडील मुख्यमंत्री असले तरी त्याने कधीही त्यांच्या पदाचा फायदा घेतला नाही. आपल्या दमदार अभिनयाने त्याने नायक आणि खलनायक दोन्ही भूमिका समर्थपणे साकारल्या.
रितेश देशमुख लवकरच ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शनही रितेश देशमुख स्वतः करत आहेत. हा चित्रपटा मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मुघल साकारणाऱ्या कलाकारांची नावं समोर आली आहेत. अभिनेता संजय दत्त, फरदीन खान आणि अभिषेक बच्चन हे मुघलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. मुघल पात्रं ताकदीची वाटावीत यासाठी या कलाकारांची निवड करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला रितेश देशमुख यांनी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. त्याने लिहिले होते – “छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर भावना आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने, आम्ही त्यांना आदरांजली वाहत आहोत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहो. जय शिवराय!” या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि रितेशची पत्नी जेनेलिया देशमुख करत आहेत. चित्रपटाची शूटिंग सुरू झाली असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.