Bhadipa: युट्युबर रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला आहे. संसदेतही या प्रकरणावर चर्चा झाली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्याच्या परिणाम म्हणून ‘भाडिपा’ने आपला प्रसिद्ध शो ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
रणवीर अलाहाबादियाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या युट्युब शोमध्ये एका स्पर्धकाला अजब प्रश्न विचारला – “तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की त्यांच्यासोबत सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल?” त्याच्या या अश्लील प्रश्नामुळे मोठा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. यानंतर रणवीरने जाहीर माफी मागितली, पण तरीही त्याच्यासह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा मुद्दा संसदेतही गाजला.
रणवीरच्या या प्रकरणाचा अप्रत्यक्ष परिणाम भाडिपाच्या ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ या शोवरही झाला. या शोचा आगामी भाग सई ताम्हणकरसोबत होणार होता, पण सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाडिपाने हा एपिसोड पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. भाडिपाने यासंदर्भात पोस्ट करत सांगितले –”सध्या वातावरण तापलेलं असल्यामुळे १४ फेब्रुवारीला होणारा शो आम्ही पुढे ढकलत आहोत. तिकिटांचे पैसे १५ दिवसांत परत मिळतील. आम्ही लवकरच आमचा ‘सभ्य’ शो घेऊन येऊ.”
भाडिपाचा ‘कांदेपोहे’ हा शो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. आधीच्या भागात भाग्यश्री लिमये आणि लीना भागवत दिसल्या होत्या. ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ हा त्याचाच पुढचा टप्पा होता, ज्याचा पहिला भाग प्रेक्षकांनी खूप एन्जॉय केला. पण आता रणवीरच्या वादामुळे पुढील भाग लांबणीवर पडला आहे.