Ranveer Allahbadia Controversy : युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अल्लाहाबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संसदीय समितीत हा मुद्दा मांडणार असल्याचे सांगितले आहे.
त्या म्हणाल्या, “कॉमेडीच्या नावाखाली अश्लील भाषा वापरणे योग्य नाही. मोठा मंच मिळतो म्हणून काहीही बोलणे चालणार नाही. पंतप्रधानांनी देखील त्याला पुरस्कार दिला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर मी संसदीय समितीत आवाज उठवेन.”
या प्रकरणावर मुंबई आणि आसाममध्ये रणवीर अल्लाहाबादिया, कॉमिक समय रैना आणि इन्फ्लुएंसर अपूर्वा मखिजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाद वाढल्यानंतर रणवीर अल्लाहाबादियाने माफी मागितली आणि सांगितले की, “माझी टिप्पणी अयोग्यच नव्हती, तर विनोदीही नव्हती. कॉमेडी माझे क्षेत्र नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे.”
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी हा व्हिडिओ पाहिला नाही, पण त्यात अश्लील गोष्टी दाखवल्या गेल्या असल्याचे ऐकले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण ते दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही. obscenity (अश्लीलता) बाबत ठरावीक नियम आहेत आणि कोणीही ते ओलांडले, तर कारवाई होईल.”