शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी (Saibaba) जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे. भाविकांची सुरक्षा लक्षात घेवून संस्थानने (Saibaba Sansthan) मोठा निर्णय घेतला आहे.
अनेकदा शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येत असताना भाविकांच्या वाहनांचा अपघात होत. या घटनांत अनेकांचा मृत्यू सुद्धा होतो. याच पार्श्वभूमीवर भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करत साईबाबा संस्थानने भाविकांसाठी विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. या विम्याची रक्कम पाच लाख आहे.
यासाठी साईबाबा संस्थानने एका कंपनीसोबत करार केलाय. यासाठी लागणाऱ्या हप्त्याची रक्कम देखील संबंधित कंपनीकडे जमा करण्यात आल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी (Insurance For Sai Devotees) दिलीय. साईभक्तांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोठी भेट साईबाबा संस्थानने दिली आहे. परंतु यासाठी काय नियम, अटी आहेत? विम्याचा लाभ कसा मिळवायचा यासंबंधी आपण सविस्तर जाणून घेऊ या.
विम्याचा लाभ मिळविण्यासाठी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी संस्थानच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणं, गरजेचं आहे. नोंदणी म्हणजेच दर्शनपास, आरती बुकिंग वगैरे असं बुकिंग करणे अपेक्षित आहे. ही योजना देश अन् विदेशातील सगळ्याचा भक्तांसाठी लागू होणार आहे.
भाविकांनी घरातून निघताना साईसंस्थानच्या संकेतस्थळावर नोंदणी करणं अनिवार्य आहे. जर रस्त्यात काही अपघात किंवा दुर्घटना घडली, तर पाच लाख रूपयांपर्यंतच्या विम्याची रक्कम नुकसानभरपाई अपघातग्रस्त साईभक्ताला किंवा त्यांच्या कुटुंबियांना दिली जाणार आहे.
या योजनेचा साईसंस्थानच्या संकेतस्थळावर नोंदणी करून निघालेल्या भक्तांनाच लाभ होणार आहे. त्यांची नोंदणी हाच भाविक शिर्डीला साईदर्शनासाठी येत आहेत, याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे शिर्डीला येताना सर्व भाविकांनी नोंदणी करावी, असं आवाहन संस्थानतर्फे करण्यात आलंय. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलंय की, साईभक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल असून भाविकांसाठी ृविमा कवच मोठा आधार ठरणार आहे.
वार्षिक उत्सव अन् गर्दीच्या काळात देखील या निर्णयामुळे भक्तांना संरक्षण मिळणार आहे. याचा कोणताही भार साईभक्तांवर टाकण्यात येणार नाही. विमा हप्ता साईबाबा संस्थानमार्फत भरला जाणार असल्याचं देखील गाडीलकर यांनी स्पष्ट केलंय. शिवाय या विम्यासाठी कोणत्याही भौगोलिक सीमेचं बंधन नाही,असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.