Sangli : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी राज्य मंडळाने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त ठेवण्यासाठी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. त्यांच्यावर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येतील. ज्या परीक्षा केंद्रांवर वारंवार गैरप्रकार घडतील, त्यांची मान्यता कायमची रद्द केली जाईल.
बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून आणि दहावीची २१ फेब्रुवारीपासून सुरू होईल. परीक्षा केंद्रांवरील सुविधा तपासण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक उपाययोजना करणार आहे. परीक्षेच्या वेळी केंद्राच्या बाहेर व्हिडिओ चित्रीकरण केले जाईल. तसेच, भरारी पथके आणि स्थिर पथके नियुक्त करण्यात येतील. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ओळख एफआरएस (चेहरा स्कॅनिंग) तंत्रज्ञानाद्वारे पडताळली जाईल. परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर परीक्षा काळात बंद ठेवली जातील. २०१८ पासून ज्या केंद्रांवर गैरप्रकार झाले आहेत, तिथले सर्व कर्मचारी बदलण्यात येणार आहेत.
सांगली जिल्ह्यातील दहावीच्या दोन आणि बारावीच्या चार केंद्रांतील सर्व कर्मचारी बदले जातील. या परीक्षांसाठी एकूण ७२,४४९ विद्यार्थी बसणार आहेत. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोनच्या मदतीने नजर ठेवली जाईल. बारावीच्या परीक्षेसाठी पुढील आठवड्यात आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षेसाठी तयारी सुरू आहे. केंद्रसंचालकांना सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षांमध्ये शिस्त राहावी आणि गैरप्रकार टाळले जावेत, यासाठी योग्य नियोजन सुरू असल्याची माहिती कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.