आज मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात (Share Market) पडझड झाली असून कोरोनानंतर प्रथमच अशा प्रकारचा ‘ब्लॅक मंडे’ पाहायला मिळत आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण आशियाई शेअर बाजारांमध्ये घसरणीचं वातावरण निर्माण झालं आहे. याला प्रमुख कारण ठरत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नविन टॅरिफ धोरण.
बाजार सुरू होताच भारतीय सेन्सेक्समध्ये तब्बल 3000 अंकांची घसरण झाली, तर निफ्टी 1000 अंकांनी कोसळला. टाटा मोटर्स, माझगाव डॉकसह अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स (Share Market) झपाट्याने खाली आले. बाजारात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.
आशियाई बाजारही हादरले; टाटा स्टीलमध्ये सर्वाधिक घसरण
भारताप्रमाणेच जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँग सेंग, आणि ऑस्ट्रेलियन बाजार मोठ्या घसरणीसह उघडले. हँग सेंगमध्ये 9% पेक्षा अधिक, तर निक्केईमध्ये 8% पेक्षा अधिक घसरण नोंदवण्यात आली. भारतीय बाजारात टाटा स्टीलचा शेअर तब्बल 10.43% ने कोसळून 125.80 रुपयांवर आला.
याशिवाय टाटा मोटर्स (8.29%), इन्फोसिस (7.01%), टेक महिंद्रा (6.85%), टीसीएस (4.99%), आणि रिलायन्स (4.55%) यांच्यासह अनेक दिग्गज कंपन्यांचे स्टॉक्स खाली आले आहेत.
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण
आज बीएसई सेन्सेक्सने मागील 75,364.69 च्या तुलनेत 71,449 च्या पातळीवर उघड घेतली. एनएसई निफ्टीने 22,904 वरून 21,758 पर्यंत घसरण केली. काही तासांतच निफ्टी 21,743 वर आला, तर सेन्सेक्स 71,425 च्या पातळीवर व्यापार करताना दिसला. शुक्रवारी सेन्सेक्स 930 अंकांनी घसरला होता आणि निफ्टी 345 अंकांनी खाली गेला होता.
त्यामुळे सोमवारचा दिवस आणखी धोकादायक ठरणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते. दरम्यान, आजचा ‘ब्लॅक मंडे’ भारतीय गुंतवणूकदारांसाठी मोठा धक्का ठरला आहे. जागतिक परिस्थिती आणि ट्रम्प प्रशासनाचे टॅरिफ धोरण यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. तज्ज्ञांनी दिलेला सल्ला लक्षात घेऊनच पुढील आर्थिक निर्णय घेणं केव्हाही हितावह ठरेल.