रात्रीच्या वेळी झोप न येणे (Sleep Disorder) ही समस्या अनेकांना सतावत असते. झोप का येत नाही या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर यात आपलीच लाईफस्टाईल कारणीभूत असल्याचे दिसून येते. जर तुम्हालाही अनिद्रेची समस्या असेल तर ही बाब निश्चितच धोकादायक आहे.
नुकत्याच केलेल्या रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. झोपताना मोबाईल स्क्रीन (Mobile Screen) किंवा अन्य स्क्रीनवर जास्तीत जास्त वेळ घालवल्याने अनिद्रेची समस्या 59 टक्क्यांपर्यंत वाढते असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे.
नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ संस्थेच्या अभ्यासकांच्या मते झोपेच्या वेळी मोबाईल पाहत बसल्याने झोपेवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते (Sleep Disorder). तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम होतो.
हा शोध नॉर्वेतील 18 ते 28 वयोगटातील 45 हजार 202 युवकांवर करण्यात आला होता. या रिसर्चमध्ये दिसून आले की स्क्रीनचा जास्तीत जास्त वापर केल्याने झोपेत कमतरता येते. झोपेची वेळ एक तासाने कमी होऊ शकते. मोबाईलवर पाहिला जाणारा कंटेंट जसे की सोशल मिडिया आणि अन्य मोबाईल ॲप या नुकसानीला प्रभावित करत नाहीत. याचाच अर्थ फक्त स्क्रीनचा उपयोग यामुळेच झोपेवर नकारात्मक परिणाम होतो.
या रिसर्च मधील प्रमुख लेखक डॉ. गुन्हिल्ड जॉन्सन हेटलँड यांच्या नुसार स्क्रिनचा वापर केल्याने झोपेत कमतरता येते. जर एखाद्या व्यक्तीला झोप येण्यात काही समस्या येत असेल आणि याला स्क्रीन टाइम जबाबदार आहे असे त्याला वाटत असेल तर अशा व्यक्तीने स्क्रीन टाइम कमी केलाच पाहिजे.
या रिसर्च मध्ये असेही दिसून आले की स्क्रीनचा अतिवापर मेंटल स्टेट, अकॅडमिक परफॉर्मन्स आणि संपूर्ण आरोग्यावरच परिणाम करू शकतो. विशेष करून विद्यार्थ्यांत अपुऱ्या झोपेची समस्या अधिक दिसून आली. या समस्या कमी करण्यासाठी व्यक्तीने झोपण्याच्या अर्धा ते एक तास आधी स्क्रीनचा वापर बंद केला पाहिजे असे हेटलॅन्ड सुचवतात.
या अभ्यासातून झोप आणि स्क्रीनचा वापर यातील संबंध अधोरेखित होतात. यासाठी जागतिक पातळीवर अधिक संशोधन झाले पाहिजे असे डॉ. हेटलँड यांनी सांगितलं. या व्यतिरिक्त आणखी एका अहवालात दिसून आले आहे की युवक पुरेशा प्रमाणात झोप घेत नाहीत. यामुळे त्यांच्यात हायपरटेंशनची समस्या निर्माण होण्याचा धोका राहतो. त्यामुळे या सगळ्याच समस्या टाळायच्या असतील तर तासनतास मोबाइल पाहणे आधी बंद करा. तुमच्या बऱ्याचशा समस्या कमी होतील.