Sonu Nigam: ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी महाकुंभ मेळ्याबाबत केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. प्रयागराजमधील संगमचे पाणी प्रदूषित असल्याचा दावा करत त्यांनी चेंगराचेंगरीत मृतांचे मृतदेह नदीत फेकण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. यामुळे नदीचे पाणी अधिक प्रदूषित झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. महाकुंभाच्या आयोजनावरही जया बच्चन यांनी सरकारला प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इतकेच नाही तर त्यांनी महाकुंभाला येणाऱ्या भाविकांच्या संख्येवरही शंका उपस्थित केली. संसदेबाहेर केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे आणि त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी जया बच्चन यांच्या विधानावर व्यंग्यात्मक टिप्पणी केली आहे. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर जयाचा व्हिडिओ शेअर करताना सोनूने त्यांना चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा सल्लाही दिला आहे.
पवित्र स्नान करण्यासाठी दररोज लाखो भाविक महाकुंभात पोहोचत आहेत. तथापि, काही जण याच महाकुंभाच्या गैरव्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करत आहेत. संसद भवनाबाहेर याबद्दल बोलताना जया बच्चन म्हणाल्या, “सध्या सर्वात जास्त दूषित पाणी कुठे आहे? तर कुंभमेळ्यात.. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह नदीत टाकण्यात आले आहेत. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. खऱ्या मुद्द्यांवर कोणीही बोलत नाही. कुंभमेळ्याला जाणाऱ्या सामान्य लोकांना कोणत्याही विशेष सुविधा पुरवल्या जात नाहीत. त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. पण व्हीआयपींसाठी सर्व सुविधा आहेत. कोट्यवधी लोक तिथे आले आहेत असा खोटा दावा केला जात आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक तिथे कसे जमू शकतात?”
सोनू निगमने जयाचा तोच व्हिडिओ त्याच्या एक्स अकाउंटवर शेअर केला. त्यावर त्याने लिहिले की, ‘जया बच्चनने तिचे मानसिक संतुलन गमावले आहे. अमिताभ जी , तिला चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा.’ या व्हिडिओवर नेटिझन्सनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी जया बच्चन यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
महाकुंभ १३ जानेवारीपासून सुरू झाला आहे आणि कुंभमेळा २६ फेब्रुवारीपर्यंत चालेल. दुर्दैवाने, २९ जानेवारी रोजी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे ३० जणांना आपला जीव गमवावा लागला. मौनी अमावस्येनिमित्त संगममध्ये पवित्र स्नान करण्यासाठी अनेक लोक मोठ्या गर्दीत जमले होते. या गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत काही जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत दोन कोटींहून अधिक भाविकांनी संगममध्ये पवित्र स्नान केले आहे.