Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला अडचणींचा सामना करावा लागत आहे. लुधियानाच्या न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. एका फौजदारी खटल्यात साक्षीदार म्हणून त्याला अनेकदा न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, तो हजर न राहिल्याने न्यायिक दंडाधिकारी रमणप्रीत कौर यांनी गुरुवारी अटक वॉरंट जारी केले.
हे वॉरंट मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील ओशिवरा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. पोलिसांना आदेश देण्यात आला आहे की, सोनू सूदला अटक करून न्यायालयासमोर हजर करावे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. लुधियानाचे वकील राजेश खन्ना यांनी 10 लाख रुपयांच्या फसवणुकीसंदर्भात मोहित शुक्ला यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. त्यानुसार, खन्ना यांनी आरोप केला आहे की, बनावट रिजिका कॉईनमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात सोनू सूदला साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले होते. मात्र, त्याने न्यायालयाच्या वारंवार समन्सकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध थेट अटक वॉरंट काढत त्यांना हजर करण्याचे आदेश दिले आहेत.