Chhaava : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या बहुचर्चित आगामी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. विकी कौशल यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना झळकणार आहे.
चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती, आणि अवघ्या ७२ तासांत तब्बल ३ लाख तिकिटे विकली गेली आहेत. मॅडडॉक फिल्म्सने ही माहिती शेअर केली आहे. तसेच, सॅकनिल्कच्या अहवालानुसार, अॅडव्हान्स बुकिंगमधून आतापर्यंत ७.३ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. ‘छावा’ साठी महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये सर्वाधिक अॅडव्हान्स बुकिंग होत आहे. प्रदर्शना अगोदरच इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याने चित्रपटाच्या पहिल्या दिवशी तिकीट विक्रीचे विक्रम होण्याची शक्यता आहे.
चित्रपटात अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार असून, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंह, डायना पेन्टी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी ए.आर. रहमान यांनी सांभाळली आहे. या जोरदार प्रतिसादाबद्दल निर्मात्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले असून, ‘छावा’ बॉक्स ऑफिसवर कसा परफॉर्म करतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे!