TET: परीक्षा निकाल राखीव उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना

माय मराठी
2 Min Read

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET) ७८६ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. आता या उमेदवारांची सुनावणी २५ मार्च ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत होणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

१० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात झालेल्या टीईटी परीक्षेनंतर काही उमेदवारांच्या निकालांबाबत शंका निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांचा निकाल तात्पुरता रोखण्यात आला होता. आता त्या उमेदवारांची सुनावणी होणार असून, याची माहिती संबंधित उमेदवारांना ई-मेल, लघुसंदेश (SMS) आणि त्यांच्या ऑनलाइन परीक्षेच्या खात्यावर पाठवण्यात आली आहे.

सुनावणीसाठी उमेदवारांना स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहावे लागेल. जर दिलेल्या दिवशी उमेदवार हजर राहू शकला नाही, तर त्याला या प्रकरणी काही म्हणायचे नाही, असे गृहित धरले जाईल. त्यानंतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अंतिम निर्णय घेतला जाईल, जो सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक असेल.

सुनावणीच्या वेळी उमेदवारांनी काही आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी लागतील. त्यामध्ये आधार कार्ड, टीईटी २०२४ परीक्षेतील उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत, परीक्षेचे प्रवेशपत्र, गुणपत्रक प्रमाणपत्र, तसेच चालक परवाना, बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र किंवा पासपोर्ट यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक असेल. महत्त्वाचे म्हणजे, उमेदवाराने स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सुनावणीवेळी उमेदवाराच्या वतीने दुसऱ्या कोणालाही उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.

या सुनावणीनंतर संबंधित उमेदवारांच्या निकालाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह सुनावणी प्रक्रिया पूर्ण करावी. यासंदर्भातील कोणत्याही अधिकृत सूचना उमेदवारांनी आपल्या ई-मेल, एसएमएस किंवा ऑनलाइन परीक्षेच्या खात्यात तपासाव्यात.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more