कल्याणमधील टिटवाळा (Titwala) परिसरात गेल्या महिन्याभरापासून बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम सुरू आहे. बुधवारी पालिकेच्या अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने टिटवाळा-वसुंद्री रस्त्यावर बेकायदा उभारलेली ६० हून अधिक जोत्यांची बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने हटवली. तसेच, एका चाळीचे बेकायदा बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आले.
वासुंद्री गावातील स्मशानभूमीच्या पाठीमागील जागेत भूमाफियांनी बेकायदा चाळी बांधण्याच्या उद्देशाने ६० पेक्षा अधिक जोत्यांची उभारणी केली होती. ही माहिती सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना मिळाली. खात्री पटल्यानंतर आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार बुधवारी तोडकाम पथकाने अचानक त्या ठिकाणी धडक कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने सर्व जोत्यांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले, तसेच तिथे टाकलेला मातीचा भराव जमिनीवर सपाट करण्यात आला.
या भागात वनराई तोडून चाळी उभारल्या जात होत्या आणि त्या बांधकामांसाठी चोरीचे पाणी वापरण्यात येत होते. त्यामुळे पुन्हा बेकायदा चाळी उभ्या राहू नयेत, यासाठी ही सर्व बांधकामे पूर्णपणे हटवण्यात आली. सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी गेल्या महिनाभरात टिटवाळा परिसरातील १,००० हून अधिक बेकायदा चाळी, व्यापारी गाळे आणि जोत्यांची बांधकामे तोडली आहेत. गेल्या २५ वर्षांत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामांविरोधात कठोर मोहीम राबवली जात आहे.
यापूर्वी काही अधिकाऱ्यांनी अशा बेकायदा बांधकामांना दुर्लक्ष केल्यामुळेच मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळी उभ्या राहिल्या. मात्र, आता आयुक्त डॉ. जाखड यांच्या आदेशावरून ही मोहीम सुरू असल्याने कोणत्याही राजकीय नेत्यांकडून हस्तक्षेप केला जात नाही. यामुळे अधिकारी निर्भयपणे कारवाई करत आहेत.
बेकायदा बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तसेच, जर कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत टिटवाळा पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली. “बेकायदा बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू आहे.