समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी (Samruddhi Mahamarg) महत्वाची बातमी आहे. या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने येत्या 1 एप्रिलपासून समृद्धीवरील पथकरात वाढ (Toll Rate) करण्याचा निर्णय घेतला आहे. हा संपूर्ण महामार्ग सुरू झाल्यावर मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कार चालकांना 1445 रुपये तर नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी 1290 रुपये लागतील.
नागपूर ते मुंबई एकूण 701 किलोमीटर अंतर आहे. सध्या नागपूर ते इगतपुरी हा जवळपास 625 किलोमीटरचा महामार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. थोड्याच अंतराचे काम बाकी आहे. येत्या महिन्याभरात उर्वरित 76 किलोमीटरचे काम पूर्ण होऊन हा रस्ताही खुला होईल असा अंदाज आहे. परंतु, हा सगळा महामार्ग सुरू होण्याआधीच टोलवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रस्ते विकास महामंडळाने मोठ्या प्रमाणात टोल वाढ केली आहे. याचा मोठा आर्थिक फटका वाहनचालकांना बसणार आहे. महामार्ग सुरू झाला त्यावेळी म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये टोलचे दर जाहीर करण्यात आले होते. कार आणि हलक्या वाहनांसाठी प्रती किलोमीटर 1.73 रुपये असा दर निश्चित करण्यात आला होता. परंतु, आता यात मोठी वाढ झाली आहे. नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी कार व हलक्या वाहनांना आधी 1080 रुपये टोल द्यावा लागत होता. तो आता 1290 रुपये होणार आहे. व्यावसायिक मिनी बससाठी 2075 रुपये, ट्रॅव्हल बससाठी 4355 रुपये, अवजड बांधकाम वाहनांसाठी 4750 रुपये तसेच अति अवजड वाहनांसाठी 8315 रुपये टोल दर निश्चित करण्यात आला आहे.
या नवीन दरांची अंमलबजावणी येत्या 1 एप्रिलपासून केली जाणार आहे. हे नवीन दर पुढील तीन वर्षे म्हणजेच 31 मार्च 2028 पर्यंत लागू राहणार आहेत. यानंतर या दरांचा आढावा घेण्यात येऊन त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल. परंतु, येत्या 1 एप्रिलपासून मात्र वाहनचालकांचा आर्थिक भार वाढणार हे मात्र निश्चित आहे. या रस्त्याने आता वाहतूक वाढू लागली आहे. रस्ता मोठा आहे. त्यामुळे वाहने अतिशय वेगात असतात. त्यामुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने होत आहे.