भारताचा माजी कर्णधार आणि प्रसिद्ध फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात बीसीसीआयशी चर्चा केल्यानंतरच विराटने निवृत्तीचे संकेत दिले होते. तथापि, त्याने अखेर आज कसोटीतून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. सोशल मीडियावर एक लांब पोस्ट लिहिताना विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्याच्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला ‘अलविदा’ म्हटले.
भारतासाठी १४ वर्षे कसोटी क्रिकेट खेळत असताना, विराटने १२३ कसोटी सामने खेळले आणि २१० डावांमध्ये ४६.८५ च्या धावगतीने ९२३० धावा केल्या. ३० शतके आणि ३१ अर्धशतके झळकावणाऱ्या विराटचा (Virat Kohli)सर्वाधिक धावा २५४ (नाबाद) आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पोहोचला.
विराट म्हणाला, “१४ वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा कसोटी क्रिकेटसाठी निळी जर्सी घातली होती. प्रामाणिकपणे सांगायचे तर, या फॉरमॅटमधील माझा प्रवास असा असेल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली आहे, मला आव्हान दिले आहे, मला आकार दिला आहे आणि मला आयुष्यभर टिकणारे धडे शिकवले आहेत.” विराटने लिहिले.
“पांढऱ्या जर्सीमध्ये खेळणे माझ्यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप खास होते. मोठे दिवस आणि काही छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही पण कायम तुमच्यासोबत राहतात,” असा उल्लेख विराटने पोस्टमध्ये केला आहे.
कोहलीने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “या फॉरमॅटमधून निवृत्त होणे माझ्यासाठी निश्चितच सोपे नाही, परंतु मला वाटते की ते योग्य आहे, ही योग्य वेळ आहे. मी माझ्याकडे असलेले सर्व काही (कसोटी क्रिकेटला) दिले आहे आणि मला अपेक्षेपेक्षा खूप जास्त मिळाले आहे. मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने निवृत्त होत आहे. मी या खेळाबद्दल, ज्या लोकांसोबत मी मैदान शेअर केले आहे आणि या प्रवासात ज्यांच्याशी मी भेटलो त्या प्रत्येकाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो,” विराटने असेही लिहिले आहे.
शेवटी, विराट म्हणाला, “मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहेन.”
You Might Also Like
विराटच्या पोस्टला लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत आणि अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.