यंदा मान्सूनने (weather) वेग घेतला असून तो अपेक्षेपेक्षा लवकर भारतात दाखल होण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी दिलेल्या अंदाजानुसार, मान्सून १३ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होणार आहे. यानंतर पुढील चार ते पाच दिवसांत तो दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन परिसरात पोहोचेल.
हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, केरळमध्ये मान्सून २३ ते २५ मे दरम्यान पोहोचू शकतो, जो सरासरी तारखेपेक्षा एक आठवडा लवकर आहे. यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मान्सूनपूर्व हवामानात लक्षणीय बदल होत आहेत.
मान्सूनपूर्व पावसाने राज्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली असून, १२ ते १५ मे या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, या काळात वीजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळतील. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहील.
या असमय पावसामुळे शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाची काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. उघड्यावर असलेले धान्य किंवा पिके झाकून ठेवावीत तसेच शेतीसंबंधी उपकरणे सुरक्षित ठिकाणी हलवावीत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत किनारपट्टी भागांत वाऱ्याचा वेगही ३०–४० किमी प्रतितासपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मासेमारांनी अथवा समुद्रात जाणाऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.