क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि डान्सर धनश्री वर्मा अधिकृतरित्या विभक्त झाले आहेत. वांद्रे कोर्टात त्यांच्या घटस्फोटाला आज (20 मार्च) मंजुरी देण्यात आली. यावेळी युजवेंद्र आणि धनश्री दोघं कोर्टात उपस्थित होते. धनश्री आणि युजवेंद्र हे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयाला त्यांच्या घटस्फोटाच्या याचिकेवर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. आयपीएलमुळे चहल 21 मार्चपासून उपलब्ध नसण्याची शक्यता असल्याने न्यायालयाने आजच त्यावर निर्णय घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून चहल आणि धनश्री एकमेकांसोबत राहत नसून त्यांच्या घटस्फोटाचा खटला कौटुंबिक न्यायालयात सुरू होता. मुंबई उच्च न्यायालयात धनश्री वर्माने सहा महिन्यांच्या कूलिंग ऑफ कालावधीत सूट देण्याची मागणी केली होती. ही याचिका उच्च न्यायालायाने स्वीकारून वांद्रे कुटुंब न्यायालयाला युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
धनश्री आणि युजवेंद्र यांच्या मध्यस्थथीने पोटगीच्या अटींवरही अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानुसार धनश्रीला चहलने 4.75 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. फेब्रुवारी 2024 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल करताना दोघांनी संयुक्त याचिका दाखल केली होती. त्यावेळी दोघांनी सहा महिन्यांचा कूलिंग-ऑफ कालावधी माफ करण्याची विनंती केली होती. परंतु कौटुंबिक न्यायालयाने ती विनंती नाकारली. युजवेंद्रने धनश्रीला मान्य केलेल्या रकमेपैकी 2.37 कोटी रुपये आधीच दिले आहेत. आता पोटगीची उर्वरित रक्कम घटस्फोटाच्या आदेशानंतर देण्यात येईल.
धनश्री आणि युजवेंद्र यांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्न केलं होतं. तर जानेवारी 2024 मध्ये दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी धनश्रीने या चर्चांना तथ्यहीन म्हटलं होतं. ट्रोलर्स माझी प्रतिमा मलिन करत आहेत, असाही आरोप तिने केला होता. या दोघांनी कोर्टात जेव्हा घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला तेव्हा सुसंगततेच्या समस्येमुळे विभक्त होत असल्याचं मुख्य कारण सांगितलं होतं. हे दोघं बऱ्याच काळापासून वेगळे राहत आहेत आणि मागील मध्यस्थीदरम्यान पोटगी देण्याच्या मुद्द्यावरही दोघांमध्ये एकसंमती झाली होती, या गोष्टी न्यायालयाने विचारात घेतल्या आहेत.
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्रचं नाव आरजे महवशसोबत जोडलं जात आहे. या दोघांना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मॅचमध्ये एकत्रसुद्धा पाहिलं होतं. महवशने चहलसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यामुळे हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे.कोरोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये युजवेंद्र आणि धनश्री यांच्याच मैत्री झाली होती. धनश्री कोरिओग्राफर असल्याने चहलने तिच्याकडे डान्सचा ऑनलाइन क्लास लावला होता. या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं. अखेर डिसेंबर 2020 मध्ये दोघांनी मोजक्या पाहुण्यांच्या आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.